जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगर परिसरातील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या घरात कुंटणखाना चालविणारी मालकीनसह तिच्या दलाल पतीला आज न्यायालयात हजर केले असता दोघांना कारागृहात रवानगी झाली तर पीडिता दोनही तरुणींना आशादीप महिला वसतीगृहात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून वाघ नगरातील शिक्षक कॉलनीतील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर रात्री उशिरा जळगाव तालुका पोलिसात कुंटणखाना मालकीन व तिचा पती दलाल विजय आनंदा सोनवणे (मुळ रा.खंडेराव नगर) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. विजय हा रिक्षा चालवून कुंटणखान्याचेही काम पाहत होता. यातील एक पीडिता नांदगाव, जि.नाशिक तर दुसरी सुरत (गुजरात) येथील रहिवाशी आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे भाड्याने घर घेऊन त्यात हा व्यवसाय सुरु होता. याबाबत खुद्द त्या कर्मचाऱ्यालाच काहीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. विजय सोनवणे व त्याची पत्नी या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी झाली.