राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक अशोक जैन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा जैन हिल्स येथे संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्य बुध्दीबळ संघटनेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक अशोक जैन यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी आमंत्रित व निरीक्षक म्हणून अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार समितीचे संचालक तथा महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, संघटनेचे उपाध्यक्ष पी.बी. भिलारे, विनय बेळे, खजिनदार फारुक शेख, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांची उपस्थिती होती.

तीन ठराव व नवीन कार्यकारिणी सर्व संमतीने मंजूर
विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. २०२३ च्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली तसेच आयत्या वेळेवरील विषयात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व अखिल भारतीय स्पर्धेसाठी राज्य संघटनेतर्फे खेळाडूंसाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात आले.

कार्यकारिणीची निवड
२०२२ ते २०२५ या चार वर्षासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने लेखी निवडणूक संचिका घोषित केली होती व त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्ष, कार्याध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच ६ उपाध्यक्ष व ६ सहसचिव या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. महाराष्ट्र राज्यातून १७ पदांसाठी फक्त १७ उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या सतरा पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड घोषित केली.

निवड झालेले पदाधिकारी
अध्यक्ष आमदार परिणय फुके (नागपूर), कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर (जळगाव), वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे (पुणे), सचिव निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार विलास म्हात्रे (रायगड), उपाध्यक्ष अभिजीत कुंटे (रायगड), गिरीश चितळे (सांगली), नरेंद्र फिरोदिया (अहमदनगर), गिरीश व्यास (नागपूर), विनय बेळे (नाशिक), व फारुक शेख (जळगाव),
सहसचिव अंकुश रक्ताडे (बुलढाणा), हेमेंद्र पटेल (औरंगाबाद), भरत चौगुले (कोल्हापूर), पी.बी. भिलारे (मुंबई), निनाद पेडणेकर (पालघर), श्रीराम खरे (रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटनेला योगदान द्यावे- अशोक जैन
निवड घोषित झाल्यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना व राज्यातील संघटनांच्या सभासदांना अशोक जैन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेला अजून पुढे कसे नेता येईल, यावर विचार विमर्श करावा, खेळाडूंच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करावे, महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू ग्रँडमास्टर होतील याकडे लक्ष केंद्रित करावे, खेळाडूंच्या हितासाठी जैन इरिगेशन सदैव आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासन देऊन चेस इन स्कूल व बुद्धिबळाच्या विकासासाठी जैन इरिगेशनतर्फे ११ लाख रुपये देणगी स्वरूपात देत असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली.

सभेतील विषया संदर्भात व संघटनेच्या विविध कार्यकारणी समिती बाबत वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजीत कुंटे यांनी मार्गदर्शन केले व लवकरच विविध समीत्या घोषित करण्यात येईल असे आश्वासित केले. सभेचे सूत्रसंचालन फारुक शेख यांनी तर आभार सहसचिव अंकुश यांनी मानले.

Protected Content