शिवकॉलनीवासियांचे पाण्यासाठीचे मध्यरात्रीचे जागरण टळणार!; वीस वर्षापासूनचा त्रास दूर होणार

जळगाव, प्रतिनिधी । शिवकॉलनी परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी रात्री २ वाजेपर्यंत जागरण करावे लागत होते. गेल्या २० वर्षापासून नागरिकांना असलेला त्रास पंधरा दिवसात दूर होणार आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शिवकॉलनीत पाहणी करून पाईपलाईनची जोडणी तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. नवीन जोडणी केल्यानंतर मनपा प्रशासनाची वीज, वेळ आणि पाणी देखील वाचणार आहे.

शिवकॉलनी परिसरातील गट क्रमांक ६० मधील नागरिकांना गेल्या २० वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागत आहे. या परिसरात मध्यरात्री १२ वाजेनंतर पिण्याचे पाणी सोडण्यात येत होते. त्यातही पाण्याचा दाब कमी असल्याने १२ तास पाणी सोडूनही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नव्हते. अनेकांना तर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. स्थानिक नगरसेवकांनी याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा अधिकारी, अमृतचे ठेकेदार यांना सोबत घेत थेट शिवकॉलनी परिसर गाठला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, सचिन पाटील, दिपमाला काळे, मनोज काळे, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर, शिवाजी पाटील, पाणी पुरवठा अभियंता अभियंता डी.एस.खडके, मनपा विभाग प्रमुख नरेंद्र जावळे, मक्तेदार प्रतिनिधी श्री.बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

१० दिवसात पूर्ण होणार काम
शिवकॉलनी परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन गिरणा टाकीकडून येते. महापौर भारती सोनवणे यांच्यासह सर्वांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. मुख्य वहिनी लवकरात लवकर दुरुस्त करून इतर व्हॉल्व्ह तात्काळ बसविण्यात यावे अशा सूचना महापौरांनी दिल्या. संपूर्ण काम तीन टप्प्यात १० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.

वेळ, पाणी, वीज, वाचणार, नागरिकांचा त्रास टळणार
संपूर्ण काम झाल्यानंतर पाण्याची टाकी भरण्याचा वेळ वाचणार आहे परिणामी वीज बचत होईल. नागरिकांना पूर्ण दाबाने आणि रात्री १० वाजेच्या आत पाणी मिळणार असल्याने नागरिकांचा त्रास देखील दूर होणार आहे. सध्या होत असलेला १२ तासांचा पाणीपुरवठ्याचा वेळ कमी होणार असल्याने पाणी व वीज बचत देखील होणार आहे. पाईपलाईन जोडणीमुळे शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, कोल्हे नगर पश्चिम भाग, मारोती पार्क, गट क्रमांक ६० च्या नागरिकांचा पाणी प्रश्न दूर होणार आहे.

Protected Content