लॉकडाऊन काळात फरसाण, मिठाईची दुकाने बंद राहणार – जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठ्यात यापूर्वी स्नॅक्स (फरसाण), कन्फेक्शनरीज, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. परंतु आता वगळण्यात आलेल्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आली असून आता या बाबींना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे.

यामध्ये व्यावसायीक व खाजगी आस्थापना सुरु ठेवण्याबाबत ई कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तु, अन्न, औषधे व औषध उत्पादनाशी संबंधित घटक आणि वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची मुभा असेल. तथापि ई कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना संबंधित कार्यक्षेत्रातील (उपविभागीय अधिकारी/तहसीलदार) यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच प्रिंट मिडियाला 20 एप्रिल, 2020 पासून सुट देण्यात आलेली आहे. तसेच वर्तमानपत्रे, मासिके यांचे घरपोच वितरण करता येईल. तथापि वर्तमानपत्रे, मासिके विक्रेता व घरपोच सेवा घेणारे ग्राहक व सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, हॅण्ड सॅनिटाईजर वापरणे आणि सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक राहील. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Protected Content