लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे भाव कोसळले; शेतकरी संकटात

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस समाधानकारक पडला. त्यामुळे काही पिके समाधानकारक आली. तर काही पिकांनी ओल्या दुष्काळाचा फटका खाल्ला. मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाने कहर केल्यामुळे शेतीमालाचे भाव चांगलेच कोसळले आहे. त्यामुळे अन्नदात्या चे जीवन मातीत आहे.

यावर्षी तालुक्यात कपाशीचे उत्पन्न बऱ्यापैकी आले. मात्र चीनमध्ये कोरोनाने कहर केल्यामुळे कापसाची निर्यात बंद होती, ती अद्यापही बंद आहे. परिणामी दिवाळी पासूनच कापूस कवडीमोल भावात विकला जात आहे. शासनाने कापसाचे ५ हजार ४५० रुपये जाहीर केले होते. मात्र सीसीआय केंद्रांचे अंतर लांब होते. त्यामुळे या केंद्रांवर नंबर लावणे, मुक्काम करणे, गाडी भाडे भरणे, लांब जाणे, परवडत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपयांप्रमाणे खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्याचा पसंत केले. दरम्यान, सीसीआईने ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जागा नसल्याचे कारण पुढे करून कापूस खरेदी केंद्र बंद केली. त्यानंतर भारतात कोरोणाने पदार्पण केल्यानंतर सीसीआय केंद्र अद्यापही बंदच आहे. त्यामुळे खाजगी व्यापारी फरदड कापूस ३५०० रुपये, तर सरसकट ४५०० ते ४६०० रुपये घेत असल्याचे दिसून येत आहे. कापूस खरेदी केंद्र बंद असल्यामुळे अद्यापही ४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे.

रब्बी हंगामातील गहू नुकताच शेतकर्‍यांच्या घरात आला. मात्र या गव्हाचे भाव चांगलेच कोसळले आहे. अडीच हजार भावाने विकला जाणारा गहू शेतकऱ्यांच्या घरात येताच १६०० ते १७०० रुपये क्विंटल प्रमाणे विकावा लागत आहे. तर हरभरा पिकाचा भावा शासनाने ४८५० रुपये भाव जाहीर केला आहे. मात्र खासगी व्यापारी ३५०० रुपये क्विंटल प्रमाणे सरसकट खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान, अतिपावसामुळे शेतकऱ्यांची ज्वारी काळी झाली होती. ही ज्वारी खाजगी व्यापार्‍यांनी केवळ ७०० ते ८०० रुपये क्विंटल प्रमाणे विकत घेतली आहे. त्यामुळे पाऊस अतिशय चांगला पडला असला तरीही शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांचा भाजीपाला मातीमोल
दरम्यान, शेतकऱ्यांनी यावर्षी भाजीपाला मोठ्या प्रमाणात लागला आहे. मात्र आठवडे बाजार बंद असल्यामुळे हा भाजीपाला विकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. लिलावामध्ये व्यापारीवर्ग हा भाजीपाला अतिशय मातीमोल किंमतीत विकला जात असून त्यावर व्यापारी पैसे कमवत आहे. शेतकरीवर्गची मात्र केलेली मेहनतही निघत नाही.

पानमळे धारक भावामुळे अडचणीत
दरम्यान, तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे पानवेलीचे मळे मोठ्या प्रमाणात लावले जात होते. गेल्या पंधरा वर्षापूर्वी पानमळ्यावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व पाणीटंचाईमुळे पानमळे चांगले संकटात सापडले होते. मात्र तरीही बारी समाज पारंपारिक व्यवसायावर अद्यापही ठाम आहे. कुऱ्हे (पानाचे) येथे काही शेतकऱ्यांनी पानमळे लावली आहे. येथील बारी समाज कपुरी जातीची नागवेलची पाने लावतात. त्यामुळे ही पाने अकोला , मुर्तीजापुर, बऱ्हाणपूर यासह देशात अनेक ठिकाणी जातात. मात्र करणामुळे रेल्वे बंद असल्यामुळे पाने बाहेर पाठवणे बंद झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे दीड-दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात आले. बारी समाज पुन्हा संकटात सापडला आहे.

Protected Content