जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवकाला धनादेशवर सही करण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच घेणाऱ्या वरसाडे येथील ग्रामसेवकासह महिला सरपंच पतीला लाचलुचपत विभागाने आज रंगेहात पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे वरसाडे ता. पाचोरा येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम करतात. मानधनाच्या धनादेशवर सही करून देण्याच्या मोबदल्यात ६ हजाराची लाच ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे(वय-५२) रा.प्लॉट नं.३, शिवनेरी नगर,भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव आणि सरपंच पती शिवदास भुरा राठोड रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव यांनी मागितली. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून तडजोडी अंती ४ हजाराची लाच स्विकारतांना ग्रामसेवक आणि सरपंच पती याला रंगेहात पकडले आहे.