नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी एक संयुक्त मोहीम राबवत लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकच्या मुसक्या आवळल्या आहेत.
लष्कर-ए-मुस्तफा ही दहशतवादी संघटना काश्मीर घाटीमधील पाकिस्तानी दहशतवादी समूह जैश-ए-मोहम्मदची प्रमुख संघटना आहे.
जम्मूच्या पोलिस महासंचालकांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. मलिकला अटक केल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक तपासात हिदायतुल्ला मलिक हा जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होता.
जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी सांगितलं की, जम्मूच्या कुंजवानीजवळ दहशतवादी हिदायतुल्ला मलिकला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड हस्तगत करण्यात आला आहे. जेव्हा पोलिस त्याला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचंही पाटील यांनी सांगितलं.