लग्नाचा बनाव करून महिलेला पुन्हा ढकलेले कुंटनखान्याच्या दलदलीत ; ९ जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । चोपडा शहरातील एका ३५ वर्षीय महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या ९ जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने आपली आपबिती नाशिकला पोलीस महानिरीक्षकांकडे मांडल्यानंतर ही कारवाई झालीय. धक्कादायक म्हणजे पिडीतेचा विश्वास संपादन करत लग्नाचा बनाव करून तिला पुन्हा कुंटनखान्याच्या दलदलीत ढकलण्यात आले होते.

पिडीतेने जिल्हा पेठ पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ वर्षांपुर्वी पुण्यातून पिडीतेला आणुन चोपडा येथील वेश्‍या व्यवसायात अडकवण्यात आले होते. मात्र कुंटणखाना मालकीनीकडून होणाऱ्या छळाला कंटाळल्याने गावातीलच संशयित आरोपी रविंद्र छबु सोनवणे(पाणीवाला) याने तेथून पिडीतेची सुटका करण्यास मदत केली होती. यामुळे पिडीतेचा त्याच्यावर विश्‍वास बसला. त्यानंतर त्यानेच लग्नाचे आमीष दाखवुन चोपड्यात आणले. नाशिक येथील एका गडावर रितीरिवाजा प्रमाणे विवाह केला, चोपड्यात भाड्याने खोली घेवुन देत नव्याने संसारही थाटला मात्र, काही दिवसातच पिडीतेचा पुन्हा तोच छळ सुरु झाला. रविंद्रने पिडीतेच्या अंगावरील  दागीने गोडबोलून घेवून घेत त्याच वेश्‍यावस्तीत जागा घेवून नव्याने व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

पिडीतेने आवाज उठवल्यावर २४ फेब्रुवारी रोजी चारचाकी जीपखाली चिरडून ठार माण्याचा प्रयत्न केला. तत्पुर्वी पिडीतेला आठ ते दहा गुंडांनी घरातून ओढून काढत बेदम मारहाण करुन अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळ काढला होता. चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल असतांना चोपडा शहर पोलिसांनी तक्रार करुनही दखल घेतली नाही. परिणामी पिडीतेने थेट नाशिक पोलिस महानिरीक्षकांची भेट घेवुन गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर या पिडीतेच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रविंद्र छबु सोनवणे, जितेंद्र ड्रायव्हर, बबलू, बंटी वाघ, किरण मराठे, रविंद्र मराठे, मंगलाबाई मराठे, संजु भालेराव, भोला कोळी यांच्या विरुद्ध बलात्कार, प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन शुन्य क्रमांकाने गुन्हा चोपडा शहर पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.

Protected Content