रेशनधारकांना मिळणार एकाच वेळी दोन महिन्याचे धान्य मोफत

पाचोरा, प्रतिनिधी । देशात कोरोना विषाणूने  हाहाकार माजविल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.  गोर गरीबांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे एकाच वेळी दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे. 

मे महिन्याचे मिळणारे अल्प किंमतीतील धान्य व मे महिन्याचे जाहीर केलेले मोफतचे धान्य मे महिन्याच्या कोट्यातून मोफत देण्याची योजना राज्य व केंद्र सरकारने हाती घेतली आहे. यामुळे सर्व बीपीएल कार्डधारक, अंत्योदय व प्राधान्य योजनेतील धान्य एकच वेळी मोफत दिले जाणार आहे. पाचोरा तालुक्यात ९ हजार ८५२ अंत्योदय कार्डधारक व १ लाख ६४ हजार ९९० प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी एकाच वेळी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पाचोरा तालुका पूरवठा निरीक्षक अधिकारी पूनम थोरात, पुरवठा तपासणी अधिकारी अजिंक्य आंधळे, उमेश शिर्के यांनी केले आहे. योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना देण्यासाठी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना खालील प्रमाणे सूचना  देण्यात आल्या आहेत. सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे मे – २०२१ करिता मोफत वितरित करावयाचे  नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. शासकीय गोदमातून आपणांस तात्काळ अन्नधान्य पाठविले जाणार आहे. माहे मे – २०२१  या महिन्याचे लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वाटप करताना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे देखील अन्नधान्य मोफत वाटप करावयाचे आहे.

म्हणजेच एका पात्र लाभार्थ्यास नियमित (रेग्युलरचे) मोफत – अंत्योदय कुटुंब योजना – प्रति कार्ड ३५ किलो (गहू -१७ किलो, तांदूळ – १० किलो, भरडधान्य -८ किलो), प्राधान्य कुटुंब योजना – प्रति सदस्य ३ किलो गहू , २ किलो तांदूळ व प्रधान मंत्री योजने अंतर्गत मोफत – अंत्योदय योजना – प्रति सदस्य – ३ किलो गहू , २ किलो तांदूळ प्राधान्य कुटुंब योजना – प्रति सदस्य ३ किलो गहू ,२ किलो तांदूळ याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.

 

Protected Content