राष्ट्रीय डाक सप्ताहानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

भुसावळ : प्रतिनिधी । राष्ट्रीय डाक सप्ताहाचे औचित्य साधून कोविड कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या भुसावळ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

या सप्ताहभरात वृक्षारोपण, कर्मचाऱ्यांशी संवाद, ग्राहकांचा सन्मान, कर्मचाऱ्यांचे समुपदेशन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव असे
उपक्रम राबवण्यात आले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव समारंभ अध्यक्षस्थानी भुसावळ डाक विभागाचे अधीक्षक पी. बी. सेलूकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डाक अधीक्षक एस. एस. म्हस्के, निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळचे पोस्ट मास्तर एजाज शेख, कार्यालय सहायक राकेश पाटील उपस्थित होते.

राकेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत भुसावळ पोस्ट विभागातर्फे केलेल्या विविधांगी उल्लेखनीय कार्याचे कथन केले. अधीक्षक पी. बी. सेलूकर व प्रमुख अतिथी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते सहायक डाक अधिक्षक शीतल म्हस्के भुसावळ, डाक निरीक्षक प्रशांत मालकर यावल, भुसावळ उपविभागाचे निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ हेड ऑफिसचे पोस्टमन आकाश राठोड, पोस्टमन शरीफ पटेल, कार्यालयीन सहाय्यक अमोल नेहेते, अविनाश चौधरी आदींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ ग्राहकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, संकटाच्या कालावधीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची वरिष्ठ कार्यालयाने घेतली दखल ही अभिमानास्पद आहे. आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून आपल्या हातून उत्तमोत्तम कार्य कसे होत राहील, याबाबतही प्रत्येकाने दक्ष राहायला हवे. पुरुषोत्तम नावाचा अधिकारी ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उत्तम पुरुष ठरला असून भुसावळ विभागाची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती हा त्याचा परिणाम असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

सत्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात पी. बी. सेलूकर यांनी भुसावळ विभागात भुसावळसह जामनेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर व बोदवड या तालुक्यातील सुमारे पस्तीस कार्यालय आणि सहाशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे काम उत्कृष्ट सुरू असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राकेश पाटील यांनी केले.

 

Protected Content