ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ठाण्यात श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारमध्ये कुचंबणा होत असल्यानेच आमदारांनी वेगळा मार्ग पत्करल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीची दादागिरी कुठवर सहन करावी असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
आज शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला चढविला. यानंतर शिंदे यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी आपल्या समर्थकांशी बोलतांना शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आजही शिवसेनेत आहेत. ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहे.अनैसर्गिक आघाडीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ठाणे जिल्ह्याच्या बाहेरही एकनाथ शिंदें यांना समर्थन मिळत आहेत. या सर्व पन्नास आमदारांना एकसारखाच त्रास झाला आहे. राज्यात चांगेल दिवस येतील अशी अपेक्षा होती. पण कार्यकर्ता खांद्यावर भगवा घेवून फक्त लढतोय, कार्यकर्त्यांची कुठलीच कामं होत नाहीय. यामुळे त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे.
ते पुढे म्हणाले की, आमदारांना निधी मिळत नाही.आमच्यावर अन्याय होत असेल तर काय फायदा या सत्तेचा. सामान्य कार्यकर्त्यापर्यंत कामं पोहोचत नाहीत. राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्यानं निधी थांबवला गेला. शिवसेना आमदारांचा एकनाथ शिंदेंवर जास्त विश्वास आहे. आम्हाला निधी मिळत नाही हीच आमची तक्रार आहे.