विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या दहा जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध पदवीधर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी तसेच इतर इच्छुक नागरिक यांच्यासमवेत बुधवार दि.२९ जून रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि.२९ जून रोजी दुपारी ३.३० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ही सहविचार सभा होणार आहे. या सभेस विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. के. एफ. पवार व निवडणूक कक्षाचे विभाग प्रमुख डॉ. एस.आर. भादलीकर हे देखील उपस्थित असणार आहेत. नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणूकीसाठी पदवीधरांचे विद्यापीठाच्या नोंदवहीत नाव नोंदणी करण्यासाठी व नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी विद्यापीठाकडून जाहिर प्रकटन, नोंदणीकृत पदवीधरांचे अर्ज विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध पदवीधर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक यांच्यासमवेत विचार विनिमय करण्यासाठी या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रतिनिधी व इच्छूकांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार तसेच निवडणूक विभागप्रमुख डॉ. एस. आर. भादलीकर यांनी केले आहे.

Protected Content