ब्रेकींग : पीक-अप वाहनाला ट्रकने उडविले; चार जण ठार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्‍या ट्रकने उडविले असून यात चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नशिराबद पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जळगाव आणि नशिराबाद येथून बकर्‍या भरून एक एमएच ४३ एडी : १०५१ क्रमांकाचे बोलेरो पीकअप वाहन फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ समोरून (भुसावळकडून ) भरधाव वेगाने येणार्‍या एमएच ०९ एचजी : ९५२१ क्रमांकाच्या ट्रकने रॉंग साईडला येऊन या वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मृत झालेल्यांची ओळख पटलेली नव्हती.

( ही दुर्घटना थोड्या वेळापूर्वीच घडली असून आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत. )

Protected Content