Home राजकीय ठाकरे सरकारची उद्या अग्नीपरीक्षा : बहुमत सिध्द करण्याचे राज्यापालांचे निर्देश

ठाकरे सरकारची उद्या अग्नीपरीक्षा : बहुमत सिध्द करण्याचे राज्यापालांचे निर्देश

0
34

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला उद्या म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिध्द करावे लागणार असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या संदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामुळे मविआ सरकारचे भविष्य उद्या ठरणार आहे.

काल दिवसभरात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला. शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार हल्ले चढविले. सायंकाळी कॅबिनेट बैठक झाल्यामुळे उध्दव ठाकरे राजीनामा देणार की काय असे वातावरण निर्माण झाले. तथापि, असे झाले नाही. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकार्‍यांसह रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवनाला भेट दिली. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेत्यांची उपस्थिती होती.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यपालांना पत्र दिले असून यात राज्यातील सद्यस्थितीबाबत अवगत करण्यात आले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार हे बाहेर असून मविआ सोबत रहायचे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुमत उरलेले नाही. यामुळे त्यांनी बहुमत सिध्द करावे अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालांच्या अधीन राहून राज्यपालांनी योग्य ते पावले उचलावीत अशी मागणी आपण ई-मेलद्वारे निवेदन पाठवून आणि प्रत्यक्ष भेऊन पत्र दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

यानंतर रात्री उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून उद्या म्हणजे ३० जून रोजी बहुमत सिध्द करण्याचे पत्र दिले आहे. हे पत्र विधानसभा सचिवांनाही पाठविण्यात आले आहे. यामुळे उद्या ठाकरे सरकारची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound