खासदार हरवल्या : भाजप आणि शिवसेनेत जुंपली !

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या खासदार गेल्या अनेक महिन्यांपासून हरवल्या असल्याचे फलक आज मतदारसंघात लावण्यात आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला आहे.

 

ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या मागील सहा महिन्यांपासून मतदारसंघात फिरकल्या नसल्याने याच मुद्यावरून भाजपने त्यांना घेरल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीकडून खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे बॅनर शहरात लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या फलकावर खासदार गायब झाल्याने आता आम्ही प्रश्‍न कुणाकडे मांडायचे असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. मनी लॉंड्रिंग, विविध संस्थांमधील घोटाळ्यांच्या संबंधित कागदपत्रे आणि पुरावे, हरीश सारडा नामक त्यांच्या विरोधकाने ईडीला सुपूर्त केले. त्यानंतर वाशिमसह इतर काही ठिकाणी धाडीही पडल्या. त्यातच त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने २७ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईतून अटक केली आणि भावना गवळी या सार्वजनीक जीवनातून दिसेनाश्या झाल्या आहेत.

२७ सप्टेंबर २०२१ रोजी भावना गवळी यांना ईडीचे समन्स आले. यानंतर आतापर्यंत ईडीने चार वेळा भावना गवळींना समन्स जारी केले आहेत, मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्या अजून एकदाही ईडीला सामोरे गेल्या नाहीत. पहिले त्यांची तब्येत खराब असल्याचे त्यांनी कळवले, त्यांना चिकन गुनिया झाला होता तर नंतर संसदेचे सत्र सुरु असल्यामुळे त्या ईडीसमोर उपस्थित झाल्या नाहीत. यामुळे आता भाजपने त्यांच्या विरोधात फलक लावले आहेत.

दरम्यान, आज सकाळी फलक लावल्याचे उघड झाल्यानंतर शिवसैनिकांनी हे फलक फाडून टाकल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Protected Content