मोठी बातमी : ३१ मार्चपासून कोरोनाच्या निर्बंधांपासून मिळणार मुक्तता !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाचे सावट दूर होण्याच्या मार्गावर असतांना आता केंद्र सरकारने ३१ मार्चपासून कोरोनाच्या नियमांपासून मुक्तता मिळणार असल्याबाबतची महत्वाची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसचा देशात प्रादुर्भाव सध्या घटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ३१ मार्चपासून देशातील सर्व   निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं मात्र अनिवार्य असणार आहे.

सध्या देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ हजार ७७८ नवीन रुग्ण आढळले असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल १ हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि ३३ जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १२ हजार ७४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात २ हजार ५४२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ८७ वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्‍यांची संख्या ५ लाख १६ हजार ६०५ झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ७३ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

या पार्श्‍वभूमिवर, आरोग्य मंत्रालयाने मास्क आणि फिजीकल डिस्टन्सींग वगळता अन्य नियम शिथील करण्याची घोषणा केली आहे. या निर्देशानुसार आता राज्य सरकारे नियम जाहीर करण्याची शक्यता आहे.

Protected Content