विखे, शेलार यांच्यासह १३ नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान

shapathvidhi

 

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला आहे. १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

 

शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. लोकसभा निवडणुकीवेळी मुलगा सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज थेट मंत्रिपदासह भाजपात प्रवेश झाला आहे. आशिष शेलार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. सावंत हे शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. तर विदर्भातून अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे विश्वासू परिणय फुके यांची वर्णी लागली आहे.

दरम्यान, मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. तर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरिश अत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले आहे.

नवे कॅबिनेट मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
संजय कुटे
सुरेश खाडे
डॉ. अनिल बोंडे
डॉ. अशोक उईके
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
तानाजी सावंत (शिवसेना)

नवे राज्यमंत्री

योगेश सागर
अतुल सावे
संजय उर्फ बाळा भेगडे
परिणय फुके
अविनाश महातेकर

Protected Content