रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे सर्वेक्षण होणार – प्रांताधिकारी डॉ. थोरबोले

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रावेर व यावल तालुक्यातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश हा अतिजोखीम असलेल्या व्यक्तींना होणारा करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा आहे. या सर्व्हेक्षणामध्ये कुटुंबातील 60 वर्षावरील, दहा वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रीया तसेच विविध व्याधीने ग्रस्त असलेले जसे-मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, फुफुसाचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती जमा केली जाणार असल्याची माहिती फैजपुरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरेबोले यांनी दिली आहे.

या सर्व्हेक्षणामध्ये कुटुंबप्रमुखाचा संपर्क क्रमांक घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण दोन्ही तालुक्यातील सर्व गावांत व शहरातही केले जाणार आहे. यासाठी शिक्षक, आरोग्यसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली गेली असून हे सर्वेक्षण आठ दिवस चालणार आहे. तरी रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांनी आपल्याकडे सर्वेक्षणासाठी येणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. जेणेकरून करोनापासून आपले व आपल्या कुटूंबातील व्यक्तींचा बचाव करण्यास मदत होईल.

सर्वेक्षण केलेल्या घरी याप्रमाणे व्यक्ती असल्यास त्यांना दूरध्वनी करुन संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची दैनंदिन माहिती घेतली जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या कुटूंबाची अचूक माहिती सर्व्हेक्षण टीमला द्यावी. व कोरोनाच्या लढाईत प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केले आहे.

Protected Content