रेल्वेद्वारे कानपूरला पुन्हा केळी पाठविण्यास प्रारंभ

रावेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तब्बल आठ वर्षानंतर कानपूर येथे रावेर रेल्वे स्थानकावरून केळी पाठविण्यास प्रारंभ झाला असून खासदार रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून पहिला रॅक रवाना केला.

गेल्या आठ वर्षांपासून येथील रेल्वे स्टेशनवरून कानपूरला होणारी केळीची वाहतूक बंद होती. ही वाहतूक शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आली. येथील रेल्वे स्टेशनवर खासदार खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केळीचा रॅक रवाना केला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात खडसे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केळी युनियनचे माजी अध्यक्ष भागवत पाटील होते.
येथील रेल्वे स्टेशनवरून पूर्वी दिल्ली, लखनौ व कानपूर येथे रेल्वेद्वारे केळीची वाहतूक होत असे. परंतु आठ वर्षांपासून ती वाहतूक बंद होती. गेल्या वर्षी कोरोना काळात रेल्वे विभागाने शेती उत्पादित मालाच्या निर्यात व वाहतुकीसाठी सबसिडीवर किसान रेल्वे सुरू केली. तेव्हापासून येथून नया आझादपूर येथे केळीची वाहतूक होत आहे. दरम्यान रावेर केळी फळ बागायतदार संघाने खासदार रक्षा खडसे यांच्याकडे कानपूर रॅक सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

खासदार खडसेंनी रेल्वे मंत्रालयात पत्रव्यवहार करून हा रॅक सुरु करण्याची परवानगी मिळवली. शनिवारपासून येथील रेल्वे स्टेशनवरून हा केळीचा रॅक खासदार खडसेंच्या उपस्थितीत रवाना झाला. रेल्वेद्वारे शेतीमाल वाहतुकीवर मिळणारी सबसिडी सुरू ठेवण्यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन त्यांनी शेतकर्‍यांना दिले. रेल्वे स्टेशन ते अजंदा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच रावेर रेल्वे स्टेशनवर शेडच्या उभारणीसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

यावेळी केळी उत्पादक महासंघाचे माजी अध्यक्ष भागवत पाटील, माजी जि.प.सभापती श्री.सुरेश धनके, जि.प.सदस्य श्री.नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, .प्रल्हाद पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, प.स.सदस्य जितू पाटील, श्री.संदीप सावळे, पी.के.महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, शुभम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, याप्रसंगी खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, देशांतर्गत केळीच्या उत्पादनात वाढ व्हावी, निर्यातक्षम केळीचे उत्पादन व्हावे तसेच परदेशात केळीची निर्यात व्हावी यासह केळीसाठी आणखीही सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दिल्या जाव्यात यासाठी दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांचा केळी क्लस्टरमध्ये समावेश झाला आहे. हा प्रकल्प या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. त्यात येणार्‍या अडचणी सोडवून नव्याने भविष्यात लागू होणार्‍या केळी क्लस्टरच्या दुसर्‍या टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश केला जाणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

भागवत पाटील, रामदास पाटील व नंदकिशोर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. रेल्वे लोको पायलटचा यावेळी सत्कार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार ऍड चंद्रदीप पाटील यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: