नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एम्प्लोईज स्टेट इन्शोसन्स कॉर्पोरेशननं (ESIC) आपल्या सर्व सदस्यांना दिलासा दिला आहे. ईएसआयसीनं त्यांचे सर्व ग्राहकांना आपात्कालिन परिस्थितीत आपल्या जवळच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याला मंजुरी दिली आहे.
यापूर्वी ईएसआयसीच्या ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या डिस्पेंन्सरी अथवा रुग्णालयात जावं लागत होतं. तसंच खासगी रुग्णालयात उपचारांसाठी रेफरल आणावं लागत होतं.
“मंडळाच्या बैठकीत आपात्कालिन परिस्थिती ईएसआयसी रुग्णालयात किंवा डिस्पेन्सरीमध्ये जाऊन रेफरल आणण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअॅक अरेस्ट सारख्या आपात्कालिन परिस्थितीत त्वरित रुग्णालयात दाखल करावं लागत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन कमिटीचे सचिव एस.पी. तिवारी यांनी दिली.
ईएसआयसीच्या ग्राहकांना आता आपात्कालिन आता इम्पॅनल्ड आणि नॉन इम्पॅनल्ड कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. यामध्ये केवळ एकच फरक असेल. इम्पॅनल्ड रुग्णालयांमधअये कॅशलेस उपचार केले जाणार आहेत. तर नॉन इम्पॅनल्ड रुग्णालयात सरकारी दरानुसार पैसे रिअँबर्स करण्यात येतील.
नॉन इम्पॅनल्ड रुग्णालयात तेव्हाच उपचार करता येतील जेव्हा रुग्णाच्या १० किलोमीटर नजीकच्या परिसरात कोणतंही ईएसआयसी अथवा इम्पॅनल्ड रुग्णालयं नसतील. ईएसआयसी आता ज्या रुग्णालयांद्वारे आरोग्य सेवा पुरवणार आहे ते स्वत: चालवले जाणार आहेत. त्यांची जबाबदारी राज्यांकडे सोपवण्यात येणार नसल्याचंही तिवारी यांनी सांगितलं.
आरोग्य सेवांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ईएसआयसीच्या २६ रुग्णालयांच्या उभारणीचं काम पूर्ण झालं आहे. तर १६ रुग्णालयांच्या उभारणीचा आराखडा तयार आहे. सध्या राज्य ईएसआयसीचे ११० रुग्णालयं चालवतात. यासाठी ईएसआयसीकडून सेवा शुल्कही दिलं जातं.