मुंबई : वृत्तसंस्था । दीर्घ आजारपणामुळे, शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणावर असलेल्या रुग्णांचे घरी जाऊन लसीकरण करण्यास मुंबईत आजपासून सुरुवात होत आहे.
सुरुवातीला अंधेरी, जोगेश्वरीचा पूर्व भाग असलेल्या के पूर्व विभागापुरतेच प्रायोगिक तत्त्वावर या लसीकरणाची सुरुवात होणार आहे. मुंबईत ४ हजार ४६६ व्यक्तींनी घरी लसीकरणासाठी नावे नोंदवली आहेत.
ज्या नागरिकांना जागेवरून हलताही येत नाही किंवा जे बऱ्याच महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देता येईल का याबाबतची पूर्वतयारी मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. मुंबईतील अशा नागरिकांची माहिती गोळा करण्याचे कामही सुरू करण्यात आले होते. आता घरी जाऊन लसीकरण करण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आजारपणासह शारीरिक व वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन लस देण्याकरिता राज्य सरकारने चाचणी सुरू केली होती.
राज्य शासनाने स्थानिक प्राधिकरणांना माहिती संकलित करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. हे लसीकरण करण्यासाठी पालिकेला राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून त्या आधारे हे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरू झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी अशा कार्यवाहीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करून पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे.
अंथरुणास खिळून असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करायचे असल्यास त्यांची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvaccsbedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे.
ज्यांचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र, संबंधित व्यक्ती किंवा नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. अशा व्यक्तींना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे आदेश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहेत. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण केले जाणार आहे.