युतीबद्दलच्या सर्व चर्चा या फक्त गप्पा-संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी । युतीत शिवसेना हा मोठा भाऊ असल्याचा पुनरूच्चार करत करत अद्याप युतीबाबत चर्चा सुरू नसल्याचे सांगून याबाबत फक्त गप्पा असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केले आहे

आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती बाबत खासदारांचा कल जाणून घेतला. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पक्षातील काही खासदारांनी युतीसाठी खूप आग्रह धरला असल्याचे वृत्त होते. या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत नेमके काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. या बैठकीचा पूर्ण तपशील बाहेर आला नसला तरी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मात्र अद्याप युतीची चर्चा सुरू झाली नसल्याचे सांगितले.

संजय राऊत म्हणाले की युतीमध्ये शिवसेना हाच मोठा भाऊ असून यापुढे देखील आमची भूमिका मोठ्या भावाची राहणार आहे. भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसून याबाबत सुरू असणार्‍या चर्चा फक्त गप्पा असल्याचे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले. यामुळे युतीबाबत अद्यापही संभ्रमाचे वातावरण असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे दरम्यान संजय राऊत यांनी आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना करमुक्तीचा दिलासा देण्याची मागणी केली आहे.

Add Comment

Protected Content