युटीआयची समभाग विक्री २९ सप्टेंबरपासून

मुंबई वृत्तसंस्था । यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने प्राथमिक भागविक्री (आयपीओ) करण्यासाठी भांडवल बाजारात उतरायचे ठरवले आहे. मत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये (एएमसी) दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी एएमसी असलेल्या यूटीआयने १० रुपये दर्शनी मूल्य असलेले समभाग आयपीओ अंतर्गत विक्रीला आणायचे ठरवले असून ही भागविक्री २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या आयपीओसाठी प्रति समभाग ५५२ ते ५५४ रुपये हा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

या आयपीओअंतर्गत ३,८९,८७,०८१ समभाग (इक्विटी शेअर्स) विक्रीला काढले जाणार आहेत. ‘ऑफर फॉर सेल’अंतर्गत भारतीय स्टेट बँकेने १,०४,५९,९४९ समभाग, भारतीय आयुर्विमा महामंडळाने १,०४,५९,९४९ समभाग, बँक ऑफ बडोदाने १,०४,५९,९४९ समभाग, पंजाब नॅशनल बँकेने ३८,०३,६१७ समभाग तर टी. रोवे प्राइस इंटरनॅशनल लिमिटेडने ३८,०३,६१७ समभाग दिले आहेत.

आयपीओ अंतर्गत यूटीआय एएमसीचे समभाग खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांना किमान २७ समभागांसाठी किंवा २७ च्या पटीत समभाग खरेदी करण्यासाठी मागणी नोंदवावी लागणार आहे. हे समभाग मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध केले जातील. कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी, अॅक्सिस कॅपिटल, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डीएसपी मेरिल लिंच, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेएम फायनान्शियल व एसबीआय कॅपिटल मार्केट्स या कंपन्या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅवेजर्स म्हणून काम पाहतील.

Protected Content