



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत १ कोटी ६३ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. सभासदांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या जोरावर बँक सातत्याने प्रगती करत असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी केले.
गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा मांडला. बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असून त्या १०८ कोटी ३१ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच बँकेचे वसूल भागभांडवल ६ कोटी १ लाख रुपये असून बँकेचा एनपीए केवळ ०.९० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेला लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून, यंदा बँकेने १ कोटी ६३ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
सभासदांच्या विश्वासामुळेच बँकेची आर्थिक वाटचाल मजबूत होत असल्याचे सांगत डॉ. पाटील यांनी भविष्यातही सभासदांना अधिक सक्षम आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या कार्याचा आणि आर्थिक वाटचालीचा आढावा उपस्थित सभासदांसमोर मांडला. वार्षिक सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत मांडण्यात आलेल्या १० विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
सभेला बँकेचे उपाध्यक्ष सोनू भंगाळे, शालीग्राम चौधरी, तज्ज्ञ संचालक हेमचंद्र वायकोळे, संचालक सुभाष पाटील, तज्ज्ञ संचालक सीए सुनील महाले, चंद्रकुमार चौधरी, सुरेश झोपे, डॉ. संपत वानखेडे, डॉ. चंद्रसिंग पवार, हरिष फालक, लिलाधर चौधरी, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, आशाताई तळेले, संगीताताई चौधरी, यमुनाबाई महाजन, डॉ. सौरभ पाटील, स्मिता चौधरी, प्रमोद पटेल यांच्यासह अन्य मान्यवर व सभासद उपस्थित होते. सभेच्या निमित्ताने उपस्थित सभासदांना आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रशिक्षणपर मार्गदर्शनही करण्यात आले. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सुरक्षित आणि योग्य आर्थिक व्यवहार कसे करावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संचालिका आशाताई तळेले यांनी आभार मानले.



