पुणे : वृत्तसंस्था । एल्गार परिषद आणि वाद या पार्श्वभूमीवर आता एल्गार परिषदेला परवानगी देऊ नये, अशी मागणी माजी संयोजक इब्राहिम खान यांनी केली आहे. तशा मागणीचं निवेदन इब्राहिम खान जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत.
एल्गारच्या नावाखाली दोन धर्मात तेढ निर्माण होत आहे. संपूर्ण हिंदू समाज कट्टर नाही. इथं आजही गंगा-जमूना तहजीब जपली जातेय. शरजील उस्मानी म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नाही. त्याच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. शरजीलच्या वक्तव्यामुळं संपूर्ण मुस्लिम समाज बदनाम होत असल्याची भावना इब्राहिम खान यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता जोरदार राजकारण पेटलं आहे. ‘आजचा हिंदू समाज हा सडका झाला आहे’ असं म्हणत शरजीलने अनेक मुद्द्यांवरुन हिंदू समाजाबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. शरजीलच्या या विधानावरुन आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केलीय. त्याचबरोबर तातडीने कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराच फडणवीसांनी दिला आहे.
दुसरीकडे भाजयुमोने पुण्यात शरजीलविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही प्रकाराचं गांभीर्य ओळखून घेत गुन्हा दाखल करुन घेतलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी शरजीलवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांतदादांनी पत्राद्वारे केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय. इतकच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केलाय. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी केला आहे.
‘असा कुठला सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली नाही तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करु,’ असा निर्वाणीचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलाय. एल्गार परिषद ही फक्त आग ओकण्याकरता, समजात तेढ निर्माण करण्यासाठी होते, असं माहिती असूनही परवानगी कशी मिळते. या परिषदेत हिंदूंच्या विरोधात बोललं जात आहे ते सरकारच्या मर्जीनं बोललं जात आहे का? असा सवालही फडणवीसांनी केलाय.