प्राचीन त्रिविक्रम मंदिरांच्या जतन व संवर्धन कामाला आले वेग

धाराशिव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सर्वात पुरातन मंदिर, अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मंदिरासमोरील सभामंडप पूर्णतः उकलून पुन्हा एकदा दीड हजार वर्षांपूर्वी होता, तसा साकारला जात आहे. त्यासाठी दीड हजार वर्षांपूर्वी ज्या विटा वापरल्या जात, अगदी तशाच विटा तयार केल्या जात आहेत. याच सभामंडपात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्तीनाथ आणि संत गोरोबा कुंभार यांच्या उपस्थितील पहिले संत संमेलन झाले होते.

राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने त्रिविक्रम मंदिराच्या जतन व संवर्धन कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे तेरच्या विकासातही मोठी भर पडणार आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे असलेले त्रिविक्रम मंदिर हे आजघडीचे राज्यातील सर्वात पुरातन मंदिर आहे. या मंदिराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सन २०२३ सालात दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानुसार प्रत्यक्षात पुरातन त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम वेगात सुरू आहे.

Protected Content