अर्थमंत्री निर्मला सीतारामन जगातील ‘पॉवरफुल लेडी’

nirmala sitaraman

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जगातील पाचव्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिल्यांदाच फोर्ब्सच्या जगातील १०० (Powerful Woman) सामर्थ्यवान स्त्रीच्या यादीत नुकताच समावेश झाला आहे. जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल या यादीत पहिल्या स्थानावर आहेत तर सीतारमण ३४वा क्रमांकावर आहेत.

या वर्षाच्या पूर्वार्धात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात पुन्हा एकदा भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. सीतारामन यांच्या खांद्यावर अवघड अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मोदी सरकार-१ मध्ये त्यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली होती. सीतारामन यांच्या कार्याची फोर्ब्सने दखल घेतली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल वुमनच्या यादीत सीतारामन यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. सीतारामन यांनी पहिल्याच प्रवेशात ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांना मागे टाकले आहे. सीतारामन या ३४ व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये महिला उद्योजक बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांचा ही समावेश आहे.

कांद्यांच्या महागाईवर संसदेत विचारलेल्या प्रश्नावर ‘कांदे खात नाही’ असे उत्तर देणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन चर्चेत आल्या होत्या. या वाक्यावरून त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. याच यादीत नुकताच टाइम मॅगझीनच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ला पुरस्काराची मानकरी ठरलेली अवघ्या सोळा वर्षाची ग्रेटा थनबर्ग हिचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.

Protected Content