मोहाडी येथील विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून ट्रक्टरसाठी एक लाख रूपये माहेरहून दिल्यानंतरही पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. कंटाळलेल्या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मोहाडी येथे शनिवार मध्यरात्री घडली. याप्रकरणी पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पूनम घनश्याम सोनवणे (वय २५, रा.मोहाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा डिसेंबर २०१७ मध्ये मोहाडी येथील घनश्याम राजेंद्र सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना आठ महिन्यांचा रुद्र नावाचा मुलगा आहे. दरम्यान, लग्नानंतर सोनवणे कुटुंबीयांनी पूनमला चांगली वागणूक दिली. त्यानंतर २०१८ मध्ये ती माहेरी (बांभोरी, ता.जळगाव) आल्यानंतर तिने भाऊ गणेश सोनवणे, आई यांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. ‘लग्नात हुंडा दिला नाही, आता ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख रुपये आण,’ अशी मागणी सासरचे लोक तिच्याकडे करीत होते. माहेरच्यांनी कपाशी विकून १ लाख रूपये दिल्यानंतरही तिचा छळ सुरू होता. शुक्रवारी घनश्याम सोनवणे यांनी शालक गणेशला फोन करून ‘तुझी बहीण माझे ऐकत नाही, ती घरची पायरी ओलांडून जाते, तिला घेऊन जा,’ असे सांगितले होते. या व‌ेळी गणेश याने मेहुणे घनश्याम यांची समजूत काढली होती.

दरम्यान शनिवारी पहाटे २.३० वाजता मयत पूनमचे पती घनश्याम यांनी फोन करून माहेरच्या मंडळींना रुग्णालयात बोलावले. रूग्णलयात माहेरचे मंडळी गेले असता पुनमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. तिच्या गळ्यावर काळे व्रण होते. गणेशने दिलेल्या फिर्यादीवरुन पूनमचा पती घनश्याम राजेंद्र सोनवणे, सासरे राजेंद्र सोनवणे, सासू संगीताबाई सोनवणे व नणंद सरलाबाई सोनवणे या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील, विशाल सोनवणे करीत आहे.

Protected Content