आसोदा गावाजवळ सुसाट कारची दोन दुचाकींना धडक

तीन जण गंभीर जखमी; जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील असोदा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १४ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इमारतीचे बांधकाम करणारे अमृत बाबुराव बारी (वय-४२), सैय्यद अशफाक अली (वय-४०) आणि गणेश पंडीत बाविस्कर (वय-३८) तिघे राहणार यावल हे रविवारी १४ मे रोजी दुपारी ४ वाजता काम आटोपून यावल येथे जण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एडी ६८८८) आणि (एमएच १९ एजी ४२४५) ने निघाले होते. जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळून दुचाकीने तिघे जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच ४३ एएन २६९१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघेजण रोडवर फेकले गेले. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. स्थानिक गावकरी आणि काही तरूणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारचालक हा दारूच्या नशेत असल्याचे समोर आले असून ग्रामस्थांनी त्याला जागेवरच पकडले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content