मृत्यु रोखण्यासाठी वेळीच उपचार होणे आवश्यक-डॉ अनुपमा बेहरे

 

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्रीय पथक जिल्ह्याच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच नगरपालिका क्षेत्रात जाऊन कोरोना परिस्थितीची पाहणी करणार आहे. दरम्यान, पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यलयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा  घेऊन विविध सूचना केल्यात. 

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधांचे नियोजन करताना गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष देऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. श्रीकांत,  एम्स, जोधपूर यांनी आज येथे दिले.

याप्रसंगी पथकातील सदस्या डॉ. अनुपमा बेहरे, एम्स, भुवनेश्वर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. रावलाणी यांच्यासह सर्व संबंधित प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोवीडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले तर निश्चितच संसर्ग वाढ थांबविता येईल, त्यादृष्टीने जनजागृती करुन लोकांकडून नियमांचे पालन प्रभावीरित्या करुन घेण्यात यावे. तसेच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करावी, गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य पद्धतीने देखरेख होण्याबरोबरच त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांकडून शासकीय दरानेच उपचार होणे बंधनकारक असल्याचेही सांगितले. प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्त्यासह पोलीस दलाची मदत घ्यावी. लसीकरण मोहीमेची माहिती घेऊन अधिक व्यापक प्रमाणात चाचण्या आणि लसीकरण मोहीमेची अमंलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

डॉ. अनुपमा बेहरे म्हणाल्या की, कोरोना मृत्यु रोखण्यासाठी बाधित रुग्णांबरोबर कोमॉर्बिड रुग्णांवरही वेळीच योग्य ते उपचार करण्यात यावेत, क्रिटीकल रुग्णांवर विशेष लक्ष ठेवून उपचार केल्यास मृत्यु रोखण्यास मदत होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या बेड साईड असिस्टंट उपक्रमांची व इतर उपाययोजना बाबतची सविस्तर माहिती यावेळी दिली.  श्री. राऊत यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याविण्याबरोबर लसीकरण केंद्रातही आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात ऑक्सीजनसाठा, रेमडीसीवीर औषध उपलब्ध असून शासनाच्या निर्बधांचे यशस्वी पालन केले जात असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उपचार सुविधा, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येत असून ग्रामीणमध्येही खासगी सीसीसी, गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने खाटांची संख्या वाढवण्यात येत असून त्याला पर्याप्त अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच नियोजन आणि समन्वयपूर्वक स्थानिक यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवल्या जात असल्याचे सांगून डॉ. पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील संर्सग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती यावेळी दिली. 

 

 

त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती आयुक्त  सतीश कुलकर्णी यांनी दिली तर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर, मृत्युदर, उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ, मास्क, पीपीई किट, लसींची उपलब्धता ॲक्टीव्ह रुग्ण, सीसीसी, डिसीएचसी, डीसीएच मधील उपलब्ध खाटांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली. तसेच सर्व संबंधितांनी यावेळी आपल्या यंत्रणेद्वारा करण्यात येत असलेल्या उपचार सुविधांबाबत यावेळी माहिती दिली.

 

 

बेड साईड असिस्टंट उपक्रमाचे कौतूक

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या बेड साईड असिस्टंट उपक्रमाचे केंद्रीय पथकाने कौतूक करुन एकदंरीत जिल्ह्यात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपायायोजनांबाबत समाधान व्यक्त केले.

केंद्रीय पथक जिल्ह्याच्या पाच दिवसांच्या दोऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच नगरपालिका क्षेत्रात जाऊन कोरोना परिस्थितीची पाहणी करणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाला काही मार्गदर्शक सुचनाही करणार आहे.

 

 

Protected Content