कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण ; केंद्रीय आरोग्यमंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी – पटोले

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी  अत्यंत हीन पातळीवर , अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्राचा अपमान केला आहे डॉ. हर्षवर्धन यांनी  महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे.” अशी मागणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व भाजपावर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना जनाची तर नाही मनाची थोडीफार शिल्लक असेल, तर केंद्राचा कैवार घेऊन महाराष्ट्रावर खोटेनाटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा नतद्रष्टपणा आणि महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करून, महाराष्ट्रासाठी आवश्यक  लस, रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यास सांगावे.”

 

“एका वर्षापूर्वी केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले. आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार आपत्ती जाहीर करणे याचा अर्थ त्या आपत्ती निवारणाची सर्वप्रकारची जबाबदारी आणि बांधिलकी स्वीकारणे आहे. त्यामुळे  संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पण दुर्देवाने केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे जबाबदारीपासून पळ काढत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य पद्धतीने बेजबाबदारपणे आरोप करत आहेत.” असंही नाना पटोले यांनी बोलून दाखवलं.

 

दुस-या लाटेचा अंदाज घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नियोजन करणे ही राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जबाबदारी होती परंतु तिचे पालन न करता नागरिकांच्या जीविताचा विचार न करता केंद्र सरकारने देशातील केवळ ८ कोटी नागरिकांना लस दिली असून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासहित इतर देशांना मोठ्या प्रमाणात मोफत लस पाठवली आहे. लसीचा पुरवठा, लसींची उपलब्धता, रेमडेसीवर व ऑक्सीजनचा पुरवठा याबाबतीत वस्तुनिष्ठ निर्णय़ घेण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करून देशाची दिशाभूल करत आहे.” असा आरोप देखील पटोले यांनी यावेळी केला.

 

काँग्रेस राज्यात कोरोनामुक्त महाराष्ट्र अभियान राबवत असून लवकरच सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या कार्यालयात २४X७ हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. याचे मुख्य कार्यालय मुंबईतील पक्ष कार्यालयात असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून  रुग्णांना सर्वप्रकारची मदत मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.  रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून १४ एप्रिलपासून राज्यभर रक्तदान शिबिरं देखील आयोजित करण्यात येणार आहेत.

Protected Content