मु.जे. महाविद्यालात ‘सुवर्णमयी नटसम्राट’ नाटकाचे उद्घाटन; हृदयस्पशी प्रसंगाने रसिक भारावले

जळगाव प्रतिनिधी | मू. जे. महाविद्यालयाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्‌घाटन बुधवारी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले. नटसम्राट नाटकाला रंगभूमीवर येण्यास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्णमयी नटसम्राट या नाट्य अभिवाचनाचा प्रयोग या वेळी सादर करण्यात आला. नाटकातील हद‌्यस्पशी प्रसंगाने रसिक भारावले होते.

मंडळाच्या अध्यक्षस्थानी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनोद ढगे, संस्कार भारतीचे मोहनत रावतोळे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी केले. विनोद ढगे यांनी सांगितले की, सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत होण्याकरिता महाविद्यालयाचे मोठे योगदान असून, आता साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास निश्चितच बळ मिळेल. शशिकांत वडोदकर यांनी जळगावच्या सांस्कृतिक चळवळीत प्रोत्साहन देण्यासोबतच सांस्कृतिक कार्यासाठी येणाऱ्या उणीवा, समस्या, अडचणी यावर मात करण्यासाठी नाट्यकर्मींच्या पाठीशी केसीई सोसायटी भक्कमपणे उभी राहील असे सांगितले. प्रा. गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विलास धनवे यांनी आभार मानले.

प्रत्येक नटाला खुणावणारे सुवर्णस्वप्न म्हणजे नटसम्राट हे नाटक ओळखले जाते. २३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. बुधवारी सुवर्णमयी नटसम्राट या नाट्य अभिवाचनाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

Protected Content