मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन — ममता बॅनर्जी

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था ।  तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. “मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.”

 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. एकूण आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आतापर्यंत दोन टप्पयातील मतदान पार पडलेलं आहे. ६ एप्रिलरोजी तिसऱ्या टप्प्यामधील मतदान होणार आहे. आतापर्यंत ६० जागांसाठी मतदान झालेलं आहे.  तिसऱ्या टप्प्यात ३१ जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपा व टीएमसीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

 

हुगळीतील देवबंदपूर येथील एका रॅलीत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजपावाल्यानो तुम्ही पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक उमेदवार शोधू शकत नाही? त्यांच्याकडे आपला कोणताही स्थानिक उमेदवार नाही. निवडणूक लढवण्यासाठी टीएमसीकडून किंवा सीपीएमकडून लोकं उधार घेतली आहेत. ती लोकं पाण्यासारखा पैसा सोडत आहेत. जी लोकं नीट सोनार बंगला बोलू शकत नाहीत, ते बंगालावर काय राज्य करणार? मी आज एका पायावर बंगाल जिंकेन आणि उद्या दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवीन.”

 

 

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मतदान आठ टप्प्यात करण्याची काय आवश्यकता होती? भाजपाच्या सांगण्यावरूनच निवडणूक प्रक्रिया लांबवली आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता निवडणूक आयोगाने बंगालमध्ये अल्पकालावधीतच निवडणूक घ्यायला नको होती का?”

 

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. आता सहा टप्प्यातील मतदान बाकी आहे. यापैकी तिसऱ्या टप्प्याचे मतदान ६ एप्रिल रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १० एप्रिल, पाचवा टप्पा – १७ एप्रिल, सहाव्या टप्पा- २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठव्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे

Protected Content