सुप्रिया सुळे अयशस्वी खासदार– ना.शिवतारे

 

 

पुणे (वृत्तसंस्था) ‘सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे हे खासदाराचे काम नाही. या स्वरूपाची कामे समाजातील अनेक मंडळांचे पदाधिकारी देखील करतात. बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्याचंच हे द्योतक आहे,’  अशी घणाघाती टीका राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज येथे केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

 

mp supriya sule said do not politics in education sector 730X365

 

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यातून मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळंच त्या विजयी झाल्या. इतर तालुक्यात त्यांना फार कमी मते मिळाली होती,’ याची आठवणही शिवतारे यांनी करून दिली. पार्थ पवार आणि सुजय विखे यांच्या उमेदवारीबद्दलही शिवतारे यांनी भाष्य केलं. ‘या दोघांचे कर्तृत्व काय आहे ? केवळ नेत्याची मुले आहेत, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या दोघांनी किमान १० वर्षे समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्षांनी करायला हवा होता,’ असेही ते म्हणाले.
पवारांबद्दल माढ्यात नाराजी-  ‘शरद पवार यांचं कार्य खूप मोठं आहे. पण माढ्यातील विकासकामांबाबत तेथील जनतेमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. पवारांनाही वार्‍याची ही दिशा समजल्यामुळं त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली,’ असे शिवतारे यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content