बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी माजी मंत्री सहकार नेते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे.
यापूर्वीही गेल्या सात वर्षांपासून डॉ. शिंगणे हे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून या निवडीची प्रतिक्षा होती.
२१ संचालक असलेल्या विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाला मोठा बहुमान आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांची सहकार क्षेत्राशी असलेली जवळीक व राज्याच्या मंत्रिमंडळात आजवर त्यांनी दहापेक्षा अधिक खात्यांची मंत्रिपदे सांभाळलेली असल्याने संचालक मंडळाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. डॉ. शिंगणे हे जाती – धर्म व पक्ष विरहित सर्वमान्य नेतृत्व म्हणून परिचित आहेत. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेश उपाध्यक्ष असून वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत.
बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या संचालक ते अध्यक्षपदापासून त्यांनी आपल्या सहकार क्षेत्रातील वाटचालीला सुरुवात केली आहे. या निवडीबद्दल संपूर्ण संचालक मंडळ व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक हरिबाबू यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.