मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – शुक्रवार दिवसभरच नव्हेतर रात्रभर आणि आज सकाळपासूनच शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले आहेत. रात्री तसेच सकाळपासूनच राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत.
खा. नवनीत राणा आणि आ.रवि राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठन करणार असल्याचे जाहीर केले होते, या पार्श्वभूमीवर शुक्रवार सकाळपासूनच मुंबईमधील ‘मातोश्री’ या बंगल्याबाहेर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. राणा दाम्पत्य अमरावती येथे शिवसैनिकांना चकवा देत गनिमी काव्याने नागपूर विमानतळावरून मुंबईत दाखल झालेत. परंतु राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस शुक्रवारी दुपारीच त्यांच्या खार येथील निवासस्थानी बजावली.
राणा दांपत्याच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दांपत्याच्या घरासमोरच जमा होत घोषणाबाजी केली. या वेळी शिवसैनिकांना राणा दांपत्य आज ‘मातोश्री’ पर्यंत पोहचू नये. यासाठी त्यांनी चारचाकी गाड्यांच्या डिक्क्या तपासून पाहण्यास सुरुवात केलीय. शिवसैनिकांच्या गर्दीमधूनहि राणा दांपत्य हे गाडीच्या डिकीमध्ये बसून मातोश्रीवर जाण्यासाठी निघू शकते, अशी शंका असल्यामुळेच खारमध्ये राणा दांपत्याच्या घराबाहेर येणाऱ्या गाड्यांच्या डिक्क्या महिला शिवसैनिकांसह पुरुष शिवसैनिक तपासून पाहत आहेत.
गेल्या २ दिवसापासून वांद्रे पूर्व परिसरात बंदोबस्त
वांद्रे पूर्व परिसरात शिवसैनिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी गेल्या दोन दिवसापासूनच आजही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कुठलीही कृती करू नका असे आवाहन पोलिसांनी राणा दांपत्याला केले असून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अंतर्गत खेरवाडी पोलिसांनी राणा दांपत्याला नोटीस देत निवास्थानावरच रोखले आहे.