दहशतवाद्यांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल – नरेंद्र मोदी

यवतमाळ (प्रतिनिधी) पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला आहे.

 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. दहशतवादी संघटनांची जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशाराच मोदी यांनी दिला. यावेळी २०१४ मध्ये याच मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला येऊन गेल्याचे मोदींनी स्मरण करून दिले. दाभडीला शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे मोदी यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या चाबीचे दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शिवाय गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी नागपुरातील अजनी ते पुणे या हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

Add Comment

Protected Content