पोलीस खात्यात जंबो भरती ; दोन टप्प्यांमध्ये भरणार पदे

नागपूर प्रतिनिधी । राज्यभरातील तरूण डोळे लाऊन असणार्‍या पोलीस भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून याच्या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये तब्बल १२५३८ कर्मचार्‍यांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पोलीस खात्यात मोठी भरती होणार असल्याचे सूतोवाच आधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलतांना देशमुख यांनी याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे.

Protected Content