वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या मिहीर शहाला अटक केली आहे. मिहीर शहा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेत्याचा मुलगा आहे. मिहिर शहाने रविवारी पहाटे बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती.

कावेरी नाखवा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास नाखवा या त्यांचे पती प्रदीप यांच्यासोबत अ‍ॅनी बेझंट रोडवरून जात होत्या. त्यावेळी मिहिर शाह चालवत असलेल्या बीएमडब्लू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नाखवा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात प्रदीप यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. याप्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.

मिहीर शहा हा एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. घटनेच्या वेळी मिहीर शाह आणि राजेंद्र सिंह बिडावत हे बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, घटनेच्या वेळी मिहीर शाह गाडी चालवत होता. या घटनेनंतर मिहीर शहा फरार झाला होता. त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि कुटुंबचालक राजेंद्रसिंह बिदावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाह आणि बिदावत मरीन ड्राइव्ह येथे ड्राईव्ह करून घरी परतत होते. घटनेच्या वेळी मिहीर शाहने मद्यपान केले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रदीप नाखवा यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. याआधी पुण्यात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली.

Protected Content