जळगाव (प्रतिनिधी) माझ्या मुलाने कायद्याप्रमाणे लग्न केले आहे. मुलगा आणि मुलगी दोघं सज्ञान आहेत. आमच्याकडे त्याबाबतचे सर्व पुरावे आहेत. परंतू राजकीय आणि आर्थिक बळाचा वापर करून मुलासह माझ्या कुटुंबीयांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील रहिवाशी भगवान बडगुजर यांनी केली आहे.
भगवान बडगुजर यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’कडे मांडलेली व्यथा अशी की, त्यांचा मुलगा तुषार यांचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. दोघांनी आपापल्या पालकांना न सांगता हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. याबाबत त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत. अगदी आम्ही स्वखुशीने लग्न केले असल्याचे जबाब साक्षीदारांसह वकीलाकडून त्यांनी नोटरी करून घेतले. त्यानंतर धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाले. त्यानंतर तेथील पोलिसांनी धरणगाव पोलिसांशी संपर्क केला. आम्ही सर्वजण धरणगाव पोलीस स्थानकात पोहचलो. त्याठिकाणी आम्ही दोघं पालकांनी आपसात समजोता करून आपापली मुलं घरी घेऊन गेलो. परंतू मुलीच्या वडिलांनी राजकीय आणि आर्थिक दबाव आणत,रात्री आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला.
वास्तविक मुलीनेच शाळेचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड हे सर्व कागदपत्र घरून आणली होती. ही कागदपत्र आम्ही आमच्या घरात तयार केलेली नाहीत. वास्तविक पोलिसांनी सर्व कागदपत्रांची खात्री करूनच गुन्हा दाखल केला पाहिजे होता. आताही आमची तिच विनंती आहे की, पोलिसांनी मुलीचे सर्व कागदपत्र तपासावेत, अगदी शाळेत जावून मुलीच्या वयाबाबत खात्री करावी. आम्ही गरीब असल्यामुळे आमच्यावर मोठा अन्याय केला जात असून विनाकारण माझ्या परिवारातील महिलांसह साधारण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही श्री. बडगुजर यांनी म्हटले आहे.
माझा मुलगा तुषार याला अटक देखील केली आहे. मुळात जर मुलगी सज्ञान आहे आणि तिने तिच्या मर्जीने लग्न केलेले आहे, तर आमच्या विरुद्ध गुन्हा का?. या गुन्ह्यामुळे आमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. आम्ही कोर्टात दाद मागणारच आहोत. परंतू पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून आम्हा गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा, असे देखील श्री. बडगुजर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात धरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी दिलेला जन्म दाखला आणि तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
https://www.facebook.com/watch/?v=489916751776755