मुंबई : वृत्तसंस्था । वादळामुळे कोकणात झालेले नुकसान आणि राज्य सरकारची अनास्था असे मुद्दे उपस्थित करत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका रूपक कथेची मांडणी करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे
गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळातून सावरत असलेल्या कोकणाला यंदा अरबी समुद्रातून गेलेल्या तौते चक्रीवादळाने तडाखा दिला. किनारपट्टी आणि खाडी किनाऱ्यावरील अनेक गावांना वादळाचा फटका बसला. चक्रीवादळानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोकण दौऱ्यावर रवाना झाले. दोन्ही नेत्यांच्या कोकण दौऱ्याचा हवाला देत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उपहासात्मक पोस्टमधून प्रहार केला आहे. मातोश्रीतून कारभार पाहत असल्याच्या आरोप करणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट्स करत उपहासात्मक पोस्टमधून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. “देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर आज कोकणात प्रत्यक्ष दाखल होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! ‘अर्थात स्क्रीनवरून… मंगळवारची सकाळ उजाडली. सीएमसाहेबांना जाग आली आणि ते हॉलमध्ये आले. अलिकडे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो. डायनिंग रूम, तिथून लिव्हिंग रूम, कधीतरी कॉन्फरन्स रूम… पायाला भिंगरी लागल्यागत सीएम साहेब फिरत असतात. आज सवयीप्रमाणे अगोदर डायनिंग रूम मध्ये न जाता साहेबांनी प्रवासाची दिशा वळवली आणि प्रोटोकॉल धावपळ उडाली. स्टाफला कोणतीच पूर्व सूचना नसल्याने तेथील कर्मचारीही भांबावून गेले. तिकडे लक्ष न देता सीएमसाहेब आपल्या खुर्चीत बसले. खुर्चीच्या हातावर कोरलेल्या लाकडी सिंहांना कुरवाळत त्यांनी एक जांभई दिली. रात्री बराच वेळ आढावा बैठक सुरू होती. सारी माहिती मिळाल्यावर, संकटग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा असे आदेश देऊनच सीएम साहेब झोपी गेले. सीएम साहेबांनी आदेश दिल्यामुळे संकटग्रस्त भागात पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरू झाली. तिकडे संकट वाढतच होते. झाडे कोसळत होती, घरे उद्ध्वस्त होत होती. भेदरलेली मुलंबाळ कोपऱ्यात बसून बाहेरचं तांडव पाहात होती,” असं म्हणत भाजपाने मुख्यमंत्र्याना उपहासात्मक टोला लगावला आहे.
“संकटग्रस्त भागातील आढावा बैठक बराच वेळ सुरू होती. सकाळी सीएम साहेबांना रिपोर्ट पाठवायची जबाबदारी एकावर सोपवून सर्वांनी डिनर घेतले, आणि ते घरोघर परतले. सीएम साहेब हॉलमध्ये येताच त्यांच्या स्पेशल सीईओने कानाजवळ जाऊन काही सल्ला दिला आणि साहेब गंभीर झाले. खुर्चीच्या हातावरच्या सिंहाना कुरवाळणे थांबवून ते मनगटातलं धाग्याचं बंधन पिरगळू लागले. आता साहेब काहीतरी महत्त्वपूर्ण बोलणार हे सीईओनं ओळखले होतं. त्यांनी तातडीने खूण केली आणि साहेबांसमोरच्या टीपॉयवर लॅपटॉप सुरू झाला. सीईओने पलिकडे संकटग्रस्त भागात एका अधिकाऱ्यास फोन लावून संकटग्रस्त नागरिकांस तातडीने ऑनलाइन आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही क्षणांतच सीएम साहेबांच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर संकटग्रस्त नागरिक मोठ्या अपेक्षेने सीएम साहेबांकडे पाहात होते. सीएम साहेबांनी चेहरा अधिक गंभीर केला आणि ते बोलू लागले… ‘या संकटात मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून संकटाच्या छाताडावर पाय देऊन त्याला, पळवून लावले आहे. मदतीसाठी मी केंद्राला आजच पत्र पाठवणार आहे. माझ्या कोकणाचे अश्रू मी वाया जाऊ देणार नाही’… असे बोलून सीएम साहेबांनी हात उचलला. स्क्रीनवर एक संकटग्रस्ताचे अश्रू अनावर झाले होते. साहेबांनी मायेने स्क्रीनवरील त्याच्या चेहऱ्यावर हात फिरविला. त्याचे स्क्रीनवरील अश्रू पुसले, आणि आभासी सांत्वन आटोपून सीएम साहेब नव्या आभासी आढावा बैठकीसाठी तयार झाले. उठताउठता सीईओकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले व म्हणाले, संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी तिकडे जावे लागत नाही. मायेचा स्पर्श घरबसल्या केलेला मायेचा स्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझा दीड वर्षांचा अनुभव आहे. मी घरातूनच राज्य चालवतोय…’ सीईओने मान हलवून कौतुकाने साहेबाकडे पाहिले. तिकडे ऑफिसमधून प्रेसनोट जारी झाली होती, ‘मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्तांचे अश्रू पुसले!’, असं म्हणत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.