सख्खी बहिण व तिच्या प्रियकराच्या खूनप्रकरणी तरुणास फाशीची शिक्षा

Death sentence 1

नांदेड, वृत्तसंस्था | जिल्ह्यातील थेरबन येथील सैराट प्रेमी युगुलाचा दोन वर्षांपूर्वी विळ्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या खून प्रकरणात भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी आज (दि.१८) एकास फाशी तर दुसर्‍यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
भोकर न्यायालयात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींना कोणती शिक्षा सुनावली जाईल, हे पाहण्यासाठी नातेवाईक व नागरिकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

 

भोकर तालुक्यातील थेरबन जि.नांदेड येथील पुजा बाबुराव दासरे (२२) हिचे भोकर येथील जेठीबा वर्षेवार याच्यासोबत मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नानंतर महिनाभरातच पूर्वीपासून प्रेम असलेल्या गावातीलच इतर समाजाच्या गोविंद विठ्ठल कराळे (२५) या युवकासोबत सदरील तरुणी विवाह झाल्यावर पळून गेली. तेलंगणातील मुधोळ तालुक्यातील खरबळा येथे प्रियकराच्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती पुजाचा भाऊ दिगंबर यास मिळाल्याने त्याने आपला चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे याला सोबत घेऊन मोटार सायकलवर खरबळा गाठले. या दोघांनी पुजा व गोविंद यास तुमच्या पळून जाण्याने समाजात बदनामी झाली, आता तुमचे लग्न बासर (तेलंगणा) येथे लावतो, असे म्हणून समजावण्याचा प्रयत्न करुन मोटारसायकलवर घेऊन निघाले. त्यावेळी दिगंबरच्या मनात वेगळाच कट शिजत असल्याने त्याने त्यांना बासरला न नेता भोकरच्या दिशेने नेले.

तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील दिवशी शिवारातील नाल्यावर दोघांना सोबत घेऊन दिगंबरने सख्खी बहिण पूजा व तिचा प्रियकर गोविंद यास आपल्याजवळील विळ्याने सपासप वार करुन गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. ही गंभीर घटना दि. २३ जुलै २०१७ रोजी घडली होती. सदर घटना आँनर किलिंगची असल्याने गाजली होती.या निर्घृण खूनप्रकरणी भोकर न्यायालयाने आठ साक्षीदार, परिस्थिती जन्म पुरावा व वैद्यकीय अहवाल तपासून गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी गुरुवारी आँनर किलिंगप्रकरणी दिगंबर बाबुराव दासरे या अविवाहित तरुणास दुहेरी निर्घृण हत्या प्रकरणी 5 हजार दंड व फाशीची शिक्षा ठोठावली तर दुसरा आरोपी मोहन नागोराव दासरे याला 11 हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Protected Content