एकनाथराव खडसे यांचा उद्या आमदारकीचा शपथविधी

मुंबई – लाईव्ह ट्रेन्स न्यूज वृत्तसेवा | नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे उद्या विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे.

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांना आमदारकीसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली. अखेर सोमवार, दि.२० जून रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. यातून ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. यानंतर राज्यात विलक्षण राजकीय घडामोडी होऊन सत्तांतर घडले. या सर्व गडबडीत ‘नवीन आमदारांचा शपथविधी नेमका केव्हा होणार ?’ याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी राजभवनात नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आज जाहीर करण्यात आली आहे.

एकनाथराव खडसे हे उद्या सकाळी राजभवनात दहावी विधान परिषद सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहे. यात त्यांच्यासोबत विधान परिषदेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतर एकूण दहा सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान एकनाथराव खडसे यांना आमदारकी मिळाल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. तथापि राज्यात सत्तांतर झाल्यामुळे खडसे समर्थक हिरमुसले आहेत. मात्र यापुढे ‘एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून पद मिळणार का ?’ याकडे आता त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

Protected Content