पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज तिसऱ्या दिवशीही पहूर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे.
आज २३ सप्टेंबर रोजी पहूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी व पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेल्या युद्ध्यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पहूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाज बांधवांनी राजमाता अहिल्याबाई होळकर, उभी गल्ली, बाजार पट्टा मार्गे बस स्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
पहूर येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार च्या जय घोषाने परिसर दुमदुमला .या रास्ता रोको आंदोलनात माजी जि.प सदस्य राजधर पांढरे,अॕड. संजय पाटील ,शैलेश पाटील,पत्रकार गणेश पांढरे ,रामेश्वर पाटील, अरुण घोलप किरण पाटील, स्नेहदीप गरुड ,आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सूत्र संचालन बंडू अशोक पाटील यांनी केले. यावेळी जामनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने जामनेरचे तहसीलदार नानासाहेब उगले, पाचोरा विभागाचे डी वाय एस पी येरळे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच श्याम सावळे, साहेबराव देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, अशोक पाटील यांच्यासह पहूर पंचक्रोशीतील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहूर येथे आज सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात हजारोंच्या वर सकल धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन सुरू होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह सर्व पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक बोलवण्यात आले होते .शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलनाची सांगता झाली.