मागासवर्गीयांच्या योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याबरोबरच योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पाहोचविण्यासाठी पुण्यात विचारमंथन होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभांगाच्या संयुक्त विद्यमाने देश पातळीवरील कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.

पुणे येथे दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री, व केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न होत आहे. विविध राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या घटकांतील लोकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी व इतर राज्यांमध्ये नव्याने लागू करण्यात येणाऱ्या योजना व त्या संदर्भातील धोरणांची आखणी नियम व कायदे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध राज्यांच्या व केंद्र शासनाच्या योजना पाहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा / विचारमंथन करुन मसुदा सदर कार्यशाळेत तयार करण्यात येणार आहे. पुण्यातील हॉटेल “दी रिट्झ कर्ट्न” येरवडा येथे होणा-या सदर विभागीय कार्यशाळेकरिता करिता पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दिव दमन, दादर नगर हवेली व गोवा असे १२ राज्यांचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय सामाजिक न्याय व विशेष अधिकारिता विभागाचे मंत्री विरेंद्र्कुमार खाटिक, राज्यमंत्री रामदास आठवले, सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पंजाब राज्याचे मंत्री डॉ. बलजीत कौर, अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार घंटा, हरियाणा राज्याचे मंत्री ओम प्रकाश यादव, जम्मू-काश्मीर राज्याचे आयुक्त आयुक्त शितल नंदा, संचालक मोहम्मद शरीफ चाक, दिल्ली राज्याचे समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद, राजस्थान राज्याचे मंत्री टिकाराम जुलै, सचिव डॉ. सुमित शर्मा, संचालक हरीमोहन मीना, मध्य प्रदेशचे मंत्री प्रेमसिंह पटेल, प्रधान सचिव प्रतीक हजेला, आयुक्त डॉ. रमेश कुमार, छत्तीसगड राज्याचे मंत्री अनिला भेदिया, सचिव भुवनेश यादव, गुजरात राज्याचे मंत्री भानुबेन मनोहरभाई बबारीया, संचालक प्रकाश सोलंकी, दिव-दमन सचिव श्रीमती भानुप्रभा, गोवा राज्याचे मंत्री सुभाष फलदेसाई व उपसंचालक सॅटानो फर्नांडिस आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी व देशातील विविध राज्यातील योजनांमध्ये राज्याच्या योजना प्रतिबिंबित व्हाव्यात यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यासाठी विशेष प्रयत्न चालवला आहे. शासनाने याकामी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने सदर विभागीय कार्यशाळा आयोजन कामी समाज कल्याण आयुक्त यांनी विविध समित्या गठीत केल्या आहेत व त्यामध्ये राज्याच्या समाज कल्याण विभागातील सर्व उपायुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर दोन दिवसाच्या परिषदेत देशातील मान्यवरांसाठी राज्यातील प्रसिद्ध लोककलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे हे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

चौकट-
“सामाजिक न्याय विभागाची राष्ट्रीय स्तरावरील विभागीय कार्यशळा आयोजित करण्याचा मान महाराष्ट्रात राज्याला मिळाला असून निश्चितच ही अभिमानाची बाब आहे, त्यामुळे देशात राज्याचे नाव लौकिक व्हावा यासाठी विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे, सदर कार्यशाळेत राज्याचे व विभागाचे कामकाज निश्चितच प्रतिबिंबित होणार आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे

Protected Content