किरकोळ कारणावरून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काळी कुत्री चावेल असे महिलेला बोलण्याच्या संशयावरून दाम्पत्याला ७ जणांनी लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, युवराज तुकाराम अहिरे (वय-५४) रा. वडगाव ता. पाचोरा जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास युवराज अहिरे हे घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी एक कुत्री आली. तेव्हा ही काळी कुत्री मला चावेल असे बोलले. शेजरी राहणाऱ्या महिलेला वाटले की, काळी कुत्री हे मला बोलले या चुकीच्या संशयावरून अर्जुन देवमन अहिरे, संगीता अर्जुन अहिरे, बारकू रामभाऊ अहिरे, माया रामभाऊ अहिरे, सोनुबाई बारकू अहिरे, विजय जगन अहिरे आणि शोभा जगन अहिरे सर्व रा. वडगाव ता. पाचोरा यांनी युवराज अहिरे व त्याच्या पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच एकाने हातातील विडा युवराज यांच्या अंगावर मारून फेकला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर युवराज अहिरे यांनी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास पाटील करीत आहे.

Protected Content