महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे वर्ग १ नोव्हेंबरपासून

मुंबई: वृत्तसंस्था । अंतिम वर्ष परीक्षांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता देशातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे वर्ग १ नोव्हेंबरपासून भरविण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीने घेतला आहे. यूजीसीने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडरही जाहीर केले आहे. राज्यातील विद्यापीठांना १८ नोव्हेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची मुभा मिळणार आहे. सत्र निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सुट्यांच्या कालावधीत कपात करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. पोखरियाल म्हणाले की विद्यापीठांमध्ये यूजी आणि पीजी प्रथम वर्षासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे तयार केलेल्या अॅकेडमिक कॅलेंडरला मंजुरी मिळाली आहे. पोखरियाल यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचं पूर्ण वेळापत्रकही जारी केलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्ष परीक्षांपासून ते नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करेपर्यंत अनेक प्रश्न उभे आहेत. यात आता प्रथम वर्षाचे वर्ग कधी सुरू करावेत, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी स्वीकारून त्यानुसार कॅलेंडर जाहीर केले.

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार – ३१ ऑक्टोबर पर्यंत, पहिले सत्र / पहिल्या वर्षाचे वर्ग सुरू होणार – १ नोव्हेंबर , परीक्षेच्या तयारीसाठी ब्रेक – १ मार्च ते ७ मार्च २०२१ पर्यंत, परीक्षा – ८ मार्च ते २६ मार्च २०२१ पर्यंत, सेमिस्टर ब्रेक – २७ मार्च ते ४ एप्रिल २०२१, सेमिस्टरचे वर्ग सुरू होणार – ५ एप्रिल २०२१, परीक्षेच्या तयारीसाठी ब्रेक – १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२१, परीक्षा – ८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२१, सेमिस्टर ब्रेक – २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२१, पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात – ३० ऑगस्ट २०२१.

Protected Content