मलेरिया साथीचा अंदाज हवामान खाते लावणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पुढील मोसमी पावसाच्या काळात मलेरियाची साथ कोणत्या भागात पसरू शकते याचा अंदाज आता भारतीय हवामान खाते देणार आहे, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले.

या अंदाजासाठी आतापर्यंत नागपूरमध्ये माहितीचा जो अभ्यास करण्यात आला, त्या प्रारूपाचा वापर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

‘अलिकडील हवामान बदल व हवामान अंदाज’ या विषयावर भारतीय विज्ञान अकादमीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की भारताने हवामानविषयक अंदाजांसाठी संगणन क्षमता वाढवली असून त्यात १० पेटाफ्लॉप ते ४० पेटाफ्लॉप यंत्रणा वापरली जात आहे. त्यातून हवामान अंदाजात सुधारणा होईल. सध्या अमेरिका, ब्रिटन, जपान यांच्यानंतर भारत हा उच्च क्षमता संगणनात आघाडीवर आहे. राष्ट्रीय मोसमी पाऊस अभियानावर ९९० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उच्च क्षमता संगणनामुळे गुंतवणुकीच्या पन्नास पट अधिक लाभ मिळाले आहेत.

ते म्हणाले की, हवामान खात्याने मलेरिया व पाऊस तसेच तापमान यांच्या संबंधांचा अभ्यास केला आहे. नागपूरहून मलेरियाबाबत मिळालेल्या माहितीचा अभ्यास केला असून आता तीच पद्धत इतरत्र वापरली जाणार आहे. मलेरियाचा उद्रेक कुठल्या ठिकाणी होऊ शकतो याचा अंदाज येत्या पावसाळ्यापासून वर्तविला जाईल. डेंग्यू, कॉलराबाबतही हीच पद्धत वापरता येईल.

जागतिक मलेरिया अहवालानुसार २०१९ मध्ये सहारा उपप्रदेशीय आफ्रिकेतील १९ देश व भारतात मलेरियाचे प्रमाण जगाच्या ९५ टक्के आहे. भारतात पर्वतीय, वन्य, आदिवासी भागात मलेरियाचे प्रमाण अधिक असते. त्यात ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. भारतात मलेरिया रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून ते २००१ मध्ये २.०८ दशलक्ष, तर २०१८ मध्ये चार लाखांपर्यंत खाली आले आहे.

Protected Content