मनुदेवीचे यात्रोत्सवानिमित्ताने हजारो भाविकांनी घेतले दर्शन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी यात्रोत्सवात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

 

दरवर्षी पिठोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी  मनुदेवीचा मोठा यात्रोत्सव साजरा केला जातो. यानुसार दि.२७ रोजी  यात्रोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या भाविकांनी  देवीच्या दर्शनासाठी मोठया संख्येने हजेरी लावली होती.  मनुदेवी सेवा प्रतिष्ठानतर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती.

ब-हाणपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या रांगेत १२ कि मी.अंतरावर खानदेशवासीयांचे कुलदैवत मनुदेवी मातेचे हेमांडपंथी मंदिर आहे.  चिंचोली गावापासून ११कि.मी. तर आडगाव कासारखेडा  येथुन साधारणतः ८ कि.मी. अंतरावर सातपुडा पर्वताच्या कुशीत हे मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावस्येला दुसऱ्या दिवशी येथील यात्रा अनेक वर्षांपासून सुरू आहे.  पूर्वी देवीच्या दर्शनासाठी सातपुड्याच्या द-या खो-या मधुन पायी जावे लागत होते. पंरतु ,मनुदेवी सेवा प्रतिष्ठानाने प्रशासनाच्या माध्यमातून याठिकाणी ब-याच सुख सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता थेट मंदिरापर्यंत चारचाकी वाहनाने प्रवास करता येत असुन यामुळे जिल्ह्यातील नव्हे तर आख्खा महाराष्ट्र भरातुन भाविक व पर्यटक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मानापुरी या आदिवासी गावापासून  मनुदेवी मातेचे मंदिर जवळपास चार ते पाच कि.मी आहे , म्हणजे पाच कि.मी.संपुर्ण सातपुड्याच्या जंगलातूनच प्रवास करून मंदिरात जाता येते. जंगलातून जाणारा तो वळणदार रस्ता , रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले उंच उंच पर्वत, द-या खो-या, उंच उंच सागवान जातीचे वृक्ष, द-या खो-या मधुन निळखळणारे पावसाचे पाणी, हिरवळीने जणुकाही शाल पांघरलेला पर्वत रांगा ,पक्षाचा किलबिलाट , औषधी व वनौषधींची संपत्ती असलेला हा परीसर जणुकाही पर्यटक व भाविकांना खुणावत असल्याचा भास होतो. मंदिराकडे जाताना रस्त्यात शासनाने बांधुन दिलेल्या पाझर तलावाजवळ मारोतीचे छोटे मंदिर आहे. मनुदेवी मातेचे दर्शन घेण्याआधी प्रथम भाविक येथुनच माथा टेकवून पुढे प्रवास करतात. या मंदिराच्या बाजूला लागुनच शासनाने बांधुन दिलेला पाझर तलाव आहे.  मनूदेवी मंदिरासमोर असलेल्या धबधबा व सातपुड्याच्या मनुदेवी परिसरातील द-या खो-यामधुन निळखळणारे पावसाचे पाणी कोठवाय नावाच्या नदीतून निळखळत याच तलावात जमा होते. प्रारंभी म्हणजे तलाव बांधण्याच्या आधी या मारोती मंदीरा पासुन चार ते पाच कि मी.अंतर कोठवाय नदीतुनच पायी प्रवास करून पायवाटेने मनुदेवी मंदिरात जावे लागत होते.  कोठवाय नदीतून मंदीराकडे जाताना त्यावेळी ही नदी  वळणदार रस्ते असल्याने एकच नदी सात वेळा पार करावी लागत होती. पंरतु, कालांतराने मनुदेवी मंदिरांच्या विकास निधीतून मंदीरापर्यत रस्त्याचे क्राक्रिंटीकरण व छोटे मोठे पुल बांधुन रस्ता तयार करण्यात आला व आज मनुदेवी मंदिरांच्या पायथ्याशी थेट चारचाकी वाहनाने जाता येते.

मंदिर परिसरात पोहचल्यावर जवळपास शंभर सव्वाशे पाय-या चढून मंदिरात जाता येते. मंदिरासमोरच ९० ते १०० फुट उंचावरुन नयनरम्य असा धबधबा कोसळतो .श्रावण महिन्यात हा धबधबा एवढ्या‌ जोरदार सुरू असतो की मंदिराच्या पाय-या वर सुद्धा पाण्याचे फवारे येतात. श्रावण महिन्यात हा धबधबा पाहण्यासाठी शाळा कॉलेज चे विद्यार्थी मोठया प्रमाणावरही गर्दी करतात .  प्राचीन काळी जंगलात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असावी म्हणून मंदिराच्या बाजूला पिण्याचे पाण्याची जिवंत विहीरी आज ही आहे.

नवरात्रौत्सवातही दहा दिवस लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. मनुदेवी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष शांताराम पाटील , उपाध्यक्ष शिवाजी पाटील , सचिव निळकंठ चौधरी , खजिनदार सोपान वाणी , विश्वस्त भास्कर पाटील , चिंधु महाजन , सतीश पाटील , सुनील महाजन , नितीन पाटील , भुषण चौधरी , योगेश पाटील ,चंदन वाणी , ज्ञानेश्वर पाटील सध्या विश्वस्त म्हणून  काम पहात आहेत.

 

Protected Content