मनावर विजय प्राप्तीचा आधार एकनाथी भागवत -हभप उमेश महाराज दशरथे

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आध्यात्मिक नगरी श्री क्षेत्र फैजपूर येथे सामूहिक विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सवात ग्रंथकौस्तुभ एकनाथी भागवताच्या चतुशतकोत्तरी महोत्सवी वर्षानिमित्त प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला. यात गेली तीन दिवस जनार्दन एकनाथ…खांब दिला भागवत या विषयावर सुश्राव्य कथा प्रवचनाचा आनंद भक्तगणांनी घेतला.

शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीला माथा..नका पाहू गुणदोष… झालो दास पायांचा.. उपेक्षिता मज… तरी लाज .. कवणाची. तुका म्हणे भागवत…केले श्रुत सकळा या विश्वगुरू वंदनीय सद्गुरु तुकोबारायांच्या अभंग चरणातून प्रवचनाला सुरुवात झाली. यावर ह. भ. प. श्री उमेश महाराज दशरथे यांनी संत कृपा झाली, इमारत फळा आली .. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया.. नामतयाचा किंकर… जेणे केला हा विस्तार.. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत .. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा, निरोपणी केले ओझा

या सुंदर ओळींनी प्रवचनाला अधिक रंगत आणली. प्रवचना च्या समारोप प्रसंगी ह. भ. प. श्री उमेश महाराज दशरथे यांनी उद्धवगीतावरील टीका म्हणजे एकनाथ भागवत. भागवती खांब आधारभूत आणि सौंदर्य वाढवणारा असून जीवन जगायला लागणाऱ्या साऱ्या वस्तू मनुष्याकडे असताना सुद्धा समाधान नाही, तर साधूंकडे यातली काहीही नसताना ते मात्र समाधानी आहेत याचं खरं रहस्य एकनाथी भागवताच्या माध्यमातून भक्त गणांसमोर उलगडत या विश्वात आपण सारे परिस्थितीमध्ये सुख शोधतो तर साधू मनस्थितीमध्ये सुख शोधतो. यावरून एकनाथी भागवताची फलश्रुती ही कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी कसं राहायचं ? व हृदय रुपी विहिरीतून लोभ क्रोधरुपी षडरीपू बाजूला सारून जीवन आनंदी कसं करायचं यावर सुंदर उपदेश दिला. जीवन जगत असताना प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा तपासली पाहिजे, हे स्पष्ट करताना महत्त्वाचे ठायी भोगावी अप्रतिष्ठा… विटवावे नष्टा पंचभूता या अनुसार माणसाने सदा नम्र असावे. पदाचा, संपत्तीचा अहंकार ठेवता कामा नये. प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकले पाहिजे असा उपदेश केला.

तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून जीवन जगण्याची कला यावेळी उपस्थितासमोर मांडण्यात आली. जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न करावा दुर्जनांचा करी संतांचा सायास हा मंत्र ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात वास्तवात आणला त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी, समृद्ध, संपन्न व आनंददायी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत ह. भ. प. श्री उमेश महाराज दशरथे यांनी केला.

कथा प्रवचनाचा शेवट माणसाच्या दुःखाला कोणते कारण असते ? याचे उत्तर आहे आपले मन यावरून मनाला वश केले की, संसारात समाधानी राहता येतं. संत कबीर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, कहत कबीरा वो नही दुखिया जिसने मन को जीता रे या अनुसार एकनाथी भागवताच्या खांबाने आपणा सार्‍यांना आनंदी जीवन जगण्याचा आधार दिला आहे. हा आधार प्रत्येकाने जीवनात उतरवावा असे नम्र आवाहन यावेळी उपस्थित भक्तगणांना करण्यात आले.

Protected Content